शो सुरू करण्याची मिळाली अनुमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पालकांसंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी करत वादात सापडलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबादियाला सोशल मीडियावर पुन्हा स्वत:चा शो प्रसारि करण्याची अनुमती दिली आहे. यापूर्वी अलाहाबादियाने न्यायालयात धाव घेत माझ्या उत्पन्नाचे साधन एकमेव असून याचमुळे शो अपलोड करण्याची अनुमती दिली जावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला असला तरीही स्वत:च्या कार्यक्रमांमध्ये शालीनता बाळगण्याचा कठोर निर्देश दिला. न्यायालयाने अटींसह द रणवीर शोचे प्रसारण पुन्हा सुरू करण्याची अनुमती दिली आहे.
इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये रणवीरने केलेली टिप्पणी अश्लील अन् आक्षेपार्ह आहे. रणवीरच्या शोवर काही काळासाठी बंदी घातली जावी असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्याच्या याचिकेला विरोध करताना केला. परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळत अलाहाबादियाला दिलासा दिला आहे.
दिशानिर्देश तयार करा
परुंत सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला सध्या विदेशात जाण्याची अनुमती नाकारली असून तपासात सामील झाल्यावरच अनुमती दिली जाऊ शकते असे म्हटले आहे. न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला ‘द रणीवर शो’मध्ये याप्रकरणी वक्तव्य करण्यास मनाई केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडिया सामग्रीला विनियमित करण्यासाठी दिशानिर्देश तयार करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी सर्व संबंधित घटकांसोबत सल्लामसलत करण्यात यावी. नैतिकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यादरम्यान संतुलन राखण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अलाहाबादियाला द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र
न्यायालयाने यापूर्वी 31 वर्षीय युट्यूबरला सर्वप्रकारचे शो अपलोड करण्यापासून रोखले होते. द रणवीर शो पुन्हा सुरू करण्याची अनुमती देताना न्यायालयाने त्याच शो नैतिकतेच्या सर्व मापदंडांचे पालन करेल, जेणेकरून कुठल्याही वयोगटातील प्रेक्षक तो पाहू शकतील असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. बीयरबायसेप्स गाय या नावाने प्रसिद्ध अलाहाबादियाने मागील महिन्यात इंडियाज गॉट टॅलेंटच्या एका इपिसोडमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.









