वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गृहपाठ न केल्याने मुस्लीम विद्यार्थ्याला हिंदू विद्यार्थ्यांकडून थोबाडीत मारविल्याच्या कथित प्रकरणाची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच या प्रकरणात आरोपांमध्ये सौम्यता आणली जाऊ नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
हे प्रकरण गंभीर आहे. यात आतापर्यंत उत्तर प्रदेश सरकारने केलेली चौकशी असमाधानकारक आहे. या प्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने चौकशी करावी आणि आपला अहवाल सादर करावा. शिक्षणाच्या अधिकारासंबंधीच्या कायद्याचे संरक्षण करण्यात उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरले आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तेचे शिक्षण देणे हे या कायद्याचे ध्येय आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जात असेल तर हे ध्येय पूर्ण होणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर आणि गंभीरपणे चौकशी केली गेली पाहिजे. राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.









