वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समलैंगिक विवाहाला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज, मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहे. 10 दिवसांच्या सुनावणीनंतर 11 मे रोजी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीत याचिकाकर्त्यांनी समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी, असा आग्रह धरला होता. तर केंद्र सरकारने समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये समलिंगी जोडपे सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग, पार्थ फिरोज मेहरोत्रा आणि उदय राज आनंद आणि इतर अनेकांचा समावेश आहे. 20 हून अधिक याचिकांपैकी बहुतेकांनी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली आहे. आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना विशेष विवाह कायद्यात संरक्षण दिले आहे, असे याचिकांमध्ये म्हटले आहे. पण समलिंगी जोडप्यांबाबत दुजाभाव होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला होता. गेल्यावषी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने या मुद्यावर सुनावणी केली. न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस. रवींद्र भट, पी. एस. नरसिंहा आणि हिमा कोहली हे खंडपीठाचे उर्वरित 4 सदस्य आहेत.









