वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या युट्यूब चॅनेललाही हॅकर्सनी दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक करण्यात आले असून या चॅनेलवरून आभासी चलनाच्या जाहिराती दिसल्याचा अनुभव शुक्रवारी अनेकांना आला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यासाठी या युट्यूब चॅनेलची निर्मिती स्वत: सर्वोच्च न्यायालयाच्याच पुढाकाराने करण्यात आली आहे.
हा प्रकार गुरुवारी रात्रीपासूनच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी दिवसभर हे चॅनेल याच स्थितीत होते. या चॅनेलवरून सर्वोच्च न्यायालयातील कारवाई न दिसता काही आभासी चलनांच्या जाहिराती दिसल्या किंवा अन्य चॅनेलवरची दृष्ये दिसून आली. नंतर या प्रकाराकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने या प्रकाराची गंभीर नोंद घेतली असून राष्ट्रीय माहिती केंद्राकडे हा मुद्दा उपस्थित केला. आता हे चॅनेल दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले असून ते पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रथमच प्रकार
सर्वोच्च न्यायालयाच्या युट्यूब चॅनेलचा प्रारंभ होऊन एक वर्षभराहून अधिक कालावधी लोटला आहे. तथापि, हे चॅनेल हॅक होण्याचा हा प्रथम प्रसंग असल्याची माहिती देण्यात आली. हॅकिंगचा मूलस्रोत शोधण्याचे काम केले जात असून हा स्रोत देशाबाहेर असण्याची शक्यताही तज्ञांनी व्यक्त केली असून अलिकडच्या काळात हा प्रकार सर्वसामान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.









