आमदार अपात्रतेसंबंधी नवे वेळापत्रक देण्याचा आदेश : विलंब न करण्याची सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणावर लवकर निर्णय द्या, अशी स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत ज्या सूचना केल्या आहेत, त्या लागू करण्यात याव्यात. निर्णय देण्यास विलंब लावू नये. अन्यथा आम्हाला वेळ निर्धारित करावी लागेल, असाही इशारा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला.
शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्ष हेतुपुरस्सर विलंब लावत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू यांनी सादर केलेल्या याचिकेवर ही सुनावणी घेण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी निर्णय घ्यावा, अशीही सूचना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी केली आहे.
अध्यक्षांविरोधात नाराजी
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणी अक्षम्य विलंब विधानसभा अध्यक्षांकडून होत आहे, असा आरोप केला. एक वर्षभर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक घोषित केले आहे. ते एक वर्षासाठीचे आहे. त्यांनी उलटतपासणीसाठी प्रदीर्घ कालावधीचे वेळापत्रक दिले आहे. पुरावे नोंदणीसाठीही विलंब केला जात आहे. घटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार अशा प्रकरणांमध्ये त्वरित सुनावणी होणे आवश्यक आहे, असे सिबल यांनी युक्तिवादात प्रतिपादन केले.
खंडपीठाकडून नाराजी
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. परदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी हे कसले वेळापत्रक तयार केले आहे, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. गेल्या सुनावणीच्या वेळी आम्ही वेळापत्रक तयार करण्याची विधानसभा अध्यक्षांना सूचना केली होती. ती हे प्रकरण अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यासाठी नव्हती. आम्ही केलेल्या सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. विधानसभा अध्यक्ष या प्रकरणाकडे गांभीर्याने पहात आहेत, अशी आमची भावना झाली पाहिजे. गेल्या जून महिन्यापासून या प्रकरणी कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही, त्यामुळे आम्हालाच वेळापत्रक ठरवावे लागेल, असाही इशारा न्यायालयाने दिला.
रोहटगी यांचा आक्षेप
मुख्यमंत्री एकनाथ श्sिंादे यांचा पक्ष मुकुल रोहटगी यांनी मांडला. त्यांनी न्यायालयाने वेळापत्रक तयार करण्यास आक्षेप घेतला. असे करणे योग्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी करण्याचा निर्णय घेतला. या अवधीत विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक सादर करावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
आम्ही वेळापत्रक तयार करू
पुढच्या सुनावणीत जर समाधानकारक वेळापत्रक सादर करण्यात आले नाही, तर ते काम सर्वोच्च न्यायालयालाच करावे लागेल. आम्ही वेळापत्रक तयार करू. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांना काम करावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर ठाकरे गट आणि शिवसेना यांच्या एकंदर 56 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिका सादर करण्यात आल्या आहेत. एकंदर 34 अशी याचिकांची संख्या आहे, अशीही माहिती देण्यात आली.
न्यायालयाची आग्रही भूमिका
ड आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणाचा निर्णय आवश्यक
ड नवे सुनावणी वेळापत्रक सादर करण्यासाठी मंगळवारपर्यंत कालावधी
ड तो पर्यंत नवे वेळापत्रक न आल्यास न्यायालयच ते तयार करणार
ड विधानसभा अध्यक्ष हेतूपुरस्सर विलंब करीत असल्याचा युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर होणार नाही : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर होणार नाही‘, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारच्या सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कोर्टाच्या आदेशांचे पालन केले जाईल, असे देखील राहुल नार्वेकर यांनी यावेळेस म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदार अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी पार पडली.
राहुल नार्वेकरांनी काय म्हटलं?
‘कोणतीही तडजोड न करता मला हा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय मी घेईनच. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशांचा अनादर कुठेही केला जाणार नाही. पण विधीमंडळाची आणि विधानभवनाचे सार्वभौमत्व राखणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवून मला निर्णय घ्यायचा आहे. विधीमंडळाचे नियम आणि संविधानाच्या तरतुदी यांच्याशी कुठेही तडजोड न करता मला निर्णय घ्यावा लागेल‘, असे राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे. तर मी लवकरात लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील राहुल नार्वेकरांनी म्हटले आहे.









