हेट स्पीच प्रकरणी 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी स्थगित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माकप नेत्या वृंदा करात यांच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 3 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली आहे. या याचिकेद्वारे भाजप नेते अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्या विरोधात एफआयआर नोंद करण्याचा आदेश देण्यास सत्र न्यायालयाच्या नकाराला आव्हान देण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांनी सीएए विरोधी निदर्शनांसंबंधी कथित स्वरुपात द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांच्याकडून स्थगितीची विनंती करण्यात आल्यावर न्यायाधीश अभय ओक आणि पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने सुनावणी स्थगित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 17 एप्रिल रोजी करात यांच्या याचिकेवर दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही भाजप खासदारांच्या विरोधात दाखल माकप नेत्या करात तसेच के.एम. तिवारी यांच्याकडून दाखल याचिका मागील वर्षी फेटाळली होती. सत्र न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता.









