वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बिल्किस बानो प्रकरणातील दोन गुन्हेगारांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे. 2002 च्या गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दोन जणांच्या शिक्षेत देण्यात आलेली सूट रद्द करण्याच्या 8 जानेवारीच्या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिकेवर विचार करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
जोपर्यंत गुजरात सरकार आमच्या मुक्ततेसंबंधी निर्णय घेत नाही तोवर अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी मागणी या दोन्ही दोषींनी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर प्रश्न उपस्थित करत सुनावणीस नकार दिला आहे. याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या एका अन्य खंडपीठाकडून देण्यात आलेल्या आदेशाच्या विरोधात दाद कशी मागू शकता, अशी विचारणा न्यायाधीश संजीव खन्ना आणि संजय कुमार यांच्या खंडपीठाने केली आहे. राधेश्याम भगवानदास शाह आणि राजूभाई बाबूलाल सोनी यांचे वकील ऋषी मल्होत्रा यांनी यानंतर याचिका मागे घेण्याची अनुमती मागितली.









