सनातनविरोधी टिप्पणी : न्यायालयात हजर राहण्यापासून सूट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सनातन धर्मविरोधी टिप्पणी प्रकरणात तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरुद्ध त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही नवीन एफआयआर दाखल केला जाणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. याशिवाय, सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने उदयनिधी यांना सुनावणीत उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा अंतरिम आदेशही वाढवला. 2023 च्या प्रकरणात दाखल केलेल्या अनेक एफआयआर एकत्रित करून तामिळनाडूमध्ये त्यांचा एकच खटला चालवावा यासाठी उदयनिधी यांनी याचिका दाखल केली होती. यावर गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 एप्रिल रोजी होणार आहे.
2 सप्टेंबर 2023 रोजी चेन्नाई येथे झालेल्या एका कार्यक्रमात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माविरुद्ध विधान केले. सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना, मलेरिया आणि डेंग्यूशी करत त्याचे उच्चाटन करण्याबद्दल भाष्य केले होते. याप्रकरणी तामिळनाडूसह देशभरात अनेक न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले होते. उदयनिधी यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागण्यासही नकार दिला होता.









