वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरीकांचे व्हिसे रद्द केले असून सर्व पाकिस्तानी नागरीकांना पाकिस्तानात परतण्याचा आदेश दिला आहे. काश्मीमधील काही कुटुंबांना भारताच्या सुरक्षा सैनिकांनी पकडले असून त्यांना पाकिस्तानात पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, अशा एका कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या कुटुंबाची पाकिस्तानात पाठवणी करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. आपण भारताचे नागरीक असून भारताच्या नागरिकत्वासंबंधी सर्व कागदपत्रे आपल्याजवळ आहेत, असे या कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यांच्या कागदपत्रांची पूर्ण पडताळणी झाल्याखेरीज या कुटुंबाला पाकिस्तानात पाठवू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे.









