न्यायाधीश शाह यांच्यासंबंधी मागणी फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना मोठा झटका दिला आहे. न्यायाधीश एम.आर. शाह यांना संबंधित प्रकरणाच्या सुनावणीतून हटविण्याची मागणी करणारी भट्ट यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 1990 मध्ये पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी भट्ट हे दोषी ठरले आहेत. या निर्णयाच्या विरोधातील याचिकेच्या समर्थनार्थ अतिरिक्त पुरावे सादर करण्याशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीपासून न्यायाधीश शाह यांना हटविण्याची मागणी भट्ट यांनी केली होती.
न्यायाधीश शाह यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून माझ्या याचिकेवर सुनावणी करताना फटकारले होते, यामुळे शाह यांचे मत पूर्वग्रहदूषित असू शकते, असा युक्तिवाद भट्ट यांच्यावतीने 9 मे रोजी करण्यात आला होता. परंतु गुजरात सरकारच्या वकिलाने भट्ट यांच्या याचिकेला विरोध दर्शविला होता.
न्यायाधीश एम.आर. शाह आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने भट्ट यांची याचिका फेटाळली आहे. प्रभुदास वैष्णानी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी भट्ट दोषी ठरले आहेत. याविरोधात भट्ट यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शाह यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून याप्रकरणाशी निगडित याचिकेवर सुनावणी करताना भट्ट यांना फटकारले हेते. या न्यायालयासाठी माझ्या मनात सर्वोच्च सन्मान आहे, परंतु न्याय केवळ होऊ नये, तो तर होतोय हे दिसणेही आवश्यक आहे. न्यायिक औचित्य पाहता न्यायाधीश शाह यांनी या सुनावणीपासून वेगळे होणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद भट्ट यांच्या वतीने वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी मंगळवारी केला होता. भट्ट यांना संबंधित प्रकरणी जून 2019 मध्ये आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.









