नवी दिल्ली :
लडाखमध्ये मागील महिन्यात झालेल्या हिंसेप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत तुरुंगात कैद सोनम वांगचुक याच्या मुक्ततेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे. सोनम यांच्या कोठडीला अवैध ठरवत त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने यापूर्वी याप्रकरणाच्या सुनावणीसाठी मंगळवारचा दिवस निश्चित केला होता, परंतु मंगळवारी वेळ कमी असल्याचे सांगत न्यायालयाने सुनावणी बुधवारपर्यंत टाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर रोजी केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश लडाखला नोटीस जारी केली होती. वांगचूक यांना 26 सप्टेंबर रोजी एनएसए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. केंद्रशासित प्रदेश लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा देण्याच्या मागणीवरून झालेल्या हिंसक निदर्शनांच्या दोन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली होती. या हिंसक निदर्शनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता तर 90 जण जखमी झाले होते.









