वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने नागरी सेवा परीक्षेत गैरप्रकार अन् चुकीच्या मार्गाने ओबीसी अन् दिव्यांग श्रेणीच्या अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकरला 14 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. न्यायाधीश बी.व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने अंतरि जामिनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली सरकार आणि युपीएससीला नोटीस जारी केली आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 2023 च्या तुकडीच्या पूजा खेडकरवर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी युपीएसएसी नागरी सेवा परीक्षा, 2022 च्या स्वत:च्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. तर तिने स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
युपीएससीने खेडकरची आयएएस अधिकारी म्हणून झालेली निवड रद्द केली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ घेतल्याच्या आरोपाच्या चौकशीनंतर तिला भविष्यात नागरी सेवा परीक्षेत सामील होण्यासही बंदी घातली आहे. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर विरोधात एफआयआर नेंदविला आहे.









