सरन्यायाधीश चंद्रचूड यांची मोठी घोषणा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाला लवकरच एनजेडीजीशी जोडले जाणार असून यामुळे लोकांना प्रलंबित प्रकरणे अन् निकालांशी संबंधित डाटा सहजपणे उपलब्ध होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाला लवकरच राष्ट्रीय न्यायिक डाटा ग्रिडसोबत जोडले जाणार आहे. एनजेडीजी हे तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे अन् निकाली काढण्याच्या दराशी संबंधित डाटाचे भांडार असल्याचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी म्हटले आहे.
वर्तमानात पोर्टल केवळ उच्च न्यायालय स्तरापर्यंतचा डाटा दर्शवितो. हे व्यासपीठ असून ते एनआयसी अन् सर्वोच्च न्यायालयाच्या इन-हाउस टीमकडून विकसित करण्यात आले आहे. केवळ एक बटन क्लिक करून प्रलंबित प्रकरणे अन् डिस्पोजल ऑफ केसेस, वर्ष-तारीख, नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत प्रकरणांची एकूण प्रलंबितता, कोरम-वार निश्चित करण्यात आलेल्या प्रकरणांच्या संख्येवर वास्तविक काळातील माहिती पाहता येणार असल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
एनजेडीजीववर डाटा अपलोड केल्याने न्यायिक क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित होणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. एनजेडीजी हे 18,735 जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालये आणि उच्च न्यायालयांचे आदेश, निर्णय आणि प्रकरणांच्या तपशीलाचा एक डाटाबेस असून तो ईकोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत एका ऑनलाइन व्यासपीठाच्या स्वरुपात निर्माण करण्यात आला आहे.









