पाटणा उच्च न्यायालयाने बजावले होते अटक वॉरंट : सुनावणीस गैरहजर राहण्याची मिळाली मुभा
वृत्तसंस्था / पाटणा
गुंतवणुकदारांना पैसे परत न केल्याप्रकरणी सहारा इंडियाचे मालक सुब्रत रॉय यांच्या विरोधात खटला सुरू आहे. पाटणा उच्च न्यायालयाने बिहार, दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालकांना सुब्रत रॉय यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाने एक दिवस आधी रॉय यांना सुनावणीस हजर राहण्याचा आदेश दिला होता, परंतु ते गैरहजर राहिले होते. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुब्रत रॉय यांना सुनावणीस प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याची सूट दिली आहे. खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत पुढील सुनावणी 19 मे रोजी निश्चित केली आहे.
उच्च न्यायालयासमोर वकिलाने रॉय यांचा वैद्यकीय अहवाल सादर केला. न्यायालयासमोर न येण्यासारखा कुठलाच आजार रॉय यांना नसल्याचे न्यायाधीश संदीप कुमार यांनी वैद्यकीय अहवाल पाहिल्यावर म्हटले आहे. सुब्रत रॉय हे उच्च न्यायालयापेक्षा वरचढ नाहीत. सुनावणीस गैरहजर राहून त्यांनी मोठी चूक केली असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
गुंतवणुकदारांनी पैसे परत मिळावेत म्हणून पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने 12 मे रोजी हजर राहण्याचा आदेश दिला होता. परंतु रॉय यांनी अंतरिम अर्ज करत सुनावणीस गैरहजर राहण्याची सूट देण्याची मागणी केली होती, न्यायालयाने ही मागणी फेटाळली होती. शुक्रवारी कुठल्याही स्थितीत सकाळी 10.30 वाजता सुब्रत रॉय यांना उपस्थित रहावे लागणार असल्याचे न्यायाधीश संदीप कुमार यांनी बजावले होते.
आजाराचे कारण
सुब्रत रॉय यांच्या वकिलाने अंतरिम अर्ज सादर केला होता. माझे वय 74 वर्षे झाले असून जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया पार पडली असली तरीही अद्याप मी आजारी आहे. यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात यावी. व्हर्च्युअली सुनावणीस उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात यावी असे रॉय यांनी या अर्जात नमूद केले होते. तसेच त्यांनी गुंतवणुकदारांची रक्कम परत करण्यासाठी विस्तृत योजना तयार असल्याचे म्हणत तत्काळ स्वरुपात 5 कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.









