भारतीयांनी केले प्रतिआंदोलन : मेलबर्न-ब्रिटनमधील दूतावासाबाहेर निदर्शने ठरली फुस्स
वृत्तसंस्था/ लंडन
दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर खलिस्तानी समर्थकांकडून 8 जुलै रोजी विदेशात आयोजित करण्यात आलेली ‘किल भारत’ रॅली पूर्णपणे अपयशी ठरली आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलियात भारतीय दूतावासांबाहेर खलिस्तान समर्थकांना गर्दी जमविता आलेली नाही. तर दुसरीकडे खलिस्तान समर्थकांना प्रत्युत्तर म्हणून भारतीयांनी हातात तिरंगे घेत भारत माता की जय अशा घोषणा दिल्या आहेत.
रॅलीद्वारे स्वत:चा उद्देश पूर्ण न करत आल्याने खलिस्तान समर्थकानी कॅनडातील भारत माता मंदिराबाहेर खलिस्तानी पोस्टर्स झळकविले आहे. भारताने याप्रकरणी कठोर भूमिका घेतल्याने विदेशात खलिस्तानींना समर्थन मिळणे बंद झाले आहे. काही दिवसांपूर्वी हरदीप निज्जरच्या हत्येनंतर शीख फॉर जस्टिसचा प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूकडून 8 जुलै रोजी ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात रॅली आयोजित करण्याची घोषणा केली गेली होती. ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. तर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनीही दूतावासांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
कॅनडाच्या ब्रॅम्पटन येथील भारत माता मंदिराबाहेर खलिस्तान समर्थकांनी आगळीक केली आहे. खलिस्तान समर्थकांनी तेथे पोस्टर लावून भारतीय मुत्सद्यांची छायाचित्रे प्रसारित करत धमकी दिली आहे. भारतीय समुदायाने कॅनडात याप्रकरणी विरोध नोंदविला आहे.
खलिस्तान समर्थकांना आता विदेशात मिळणारे समर्थन कमी होऊ लागले आहे. यामागे भारत सरकारकडून निर्माण करण्यात येणारा दबाव आणि खलिस्तान समर्थकांकडून भारतीय दूतावास तसेच मुत्सद्यांना नुकसान पोहोचविण्याची धमकी कारणीभूत आहे. या धमकीनंतर कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनी स्वत:च्या भूमिकेत बदल करण्यास सुरुवात केली आहे.









