कार्यकर्त्यांनी काढली गावात प्रचारफेरी : निवडून आणण्याचा निर्धार
वार्ताहर /किणये
म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना बहाद्दरवाडी गावातून पाठिंबा दर्शविण्यात आला. गुरुवारी सायंकाळी गावात चौगुले यांची भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीमध्ये कार्यकर्ते व महिलांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या व हातात भगवे ध्वज घेतल्यामुळे भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील ब्रह्मलिंग मंदिर येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली. या प्रचार फेरीत बेळगाव, कारवार ,निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्यामुळे अवघा परिसर दुमदुमला होता. पश्चिम भागातील बहाद्दरवाडी गाव हे महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. ही परंपरा सर्वांनी आभादीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. या निवडणुकीतही महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार चौगुले यांना भरघोस मतदान करा असे यावेळी काही प्रमुख मान्यवरांनी सांगितले. सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी लाठ्या खालेल्या आहेत तुरुंगवास भोगलेला आहे. वडीलधारी मंडळी सीमासत्याग्रही म्हणूनही आहेत. त्यांची आजवर एकच तळमळ आहे की हा भाग महाराष्ट्रात सामील व्हावा. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करूया असेही यावेळी काही कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले. गावातील सर्व गल्ल्यांमध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. त्यानंतर बहाद्दरवाडी ग्रामस्थांच्या वतीने शिवनगरातही प्रचार फेरी काढण्यात आली. या दोन्ही गावच्यावतीने आर.एम. चौगुले यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शविण्यात आला असून भरघोस मतदान करणार असेही सांगितले. या प्रचारफेरीत चौगुले यांचे घागर हे चिन्ह असल्याने बऱ्याच महिलांनी डोक्यावर घागर घेऊनही प्रचार केला.









