‘सीडब्ल्यूसी’मध्ये काँग्रेसची ग्वाही : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारची रणनीती स्पष्ट नसल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणी (सीडब्ल्यूसी) बैठकीला संबोधित केले. पहलगाम हल्ल्यानंतर सरकार रणनीती ठरवू शकत नाही असा आरोप करतानाच संपूर्ण विरोधी पक्ष दहशतवादाच्या मुद्यावर केंद्र सरकारसोबत असल्याची ग्वाही दिली. देशासमोर कोणतीही आव्हाने असली तरी त्यांचा सामना एकजुटीने केला जाईल. या मुद्यावर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत आहे. आम्ही हा संदेश संपूर्ण जगाला दिला आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
दिल्लीत शुक्रवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) एका महत्त्वाच्या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जातनिहाय जनगणनेवर चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई न करण्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रश्न उपस्थित केले. या घटनेला अनेक दिवस उलटूनही सरकारकडून कोणतीही स्पष्ट रणनीती समोर आलेली नाही. तरीही दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही सरकारला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन खर्गे यांनी दिले. दहशतवादाच्या मुद्यावर आम्ही एकजूट होऊन देशाच्या एकता, अखंडता आणि समृद्धीच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला कठोरपणे तोंड देऊ, असेही ते पुढे म्हणाले. पहलगाम हल्ल्यातील बळींना हुतात्मा दर्जा द्यावा, अशी मागणीही काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
जात जनगणनेच्या निर्णयावर चर्चा
जातीय जनगणना करण्याच्या सरकारच्या घोषणेला काँग्रेसचा विशेषत: पक्षाचे नेते राहुल गांधींचा विजय असल्याचे भाष्य खर्गे यांनी केले. भारत जोडो यात्रा आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मांडलेल्या मुद्यानंतर हट्टी सरकारला पुन्हा एकदा झुकावे लागले, असे खर्गे म्हणाले. सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयाचे पूर्ण श्रेय राहुल गांधींना देत खर्गे यांनी बैठकीत त्यांचे अभिनंदन केले. सरकारने आमची वर्षानुवर्षे जुनी मागणी मान्य केली आहे परंतु निवडलेल्या वेळेने आम्हाला आश्चर्यचकित केले. ज्या भाषेतून आणि भावनांनी अनेक गोष्टी बोलल्या गेल्या त्याबद्दल आपल्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.









