नासीर बागवान यांच्या वाढदिनी निधर्मी जनता दलाचे राज्य अध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांचे आवाहन : विविध मठाधीशांची उपस्थिती
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयातील अनेक गावांना पक्के रस्ते नाहीत, ज्या ठिकाणी रस्ते आहेत ते नादुऊस्त झाले आहेत. त्यामुळे जनतेला रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी धडपडावे लागते. त्यामुळे जनता वैतागली आहे. खानापूरचा विकास साधण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाण्यासाठी आगामी निवडणुकीतील निधर्मी जनता दलाचे उमेदवार नासीर बागवान यांना निवडून द्यावे, असे आवाहन निधर्मी जनता दलाचे राज्य अध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी केले.
निजद राज्य कोअर कमिटी सदस्य व मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मलप्रभा क्रीडांगणावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. इब्राहिम पुढे म्हणाले, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या बरोबर नासीर बागवान यांच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी काम केले आहे. देशसेवेचा वसा बागवान यांच्या रक्तात आहे. त्यामुळेच ते जनतेच्या कल्याणाबरोबर सर्व धर्मियांना समान मानतात. त्यांनी गोरगरिबांची सेवा करून व स्वखर्चाने रस्ते व पूल बांधून जनतेचा आशीर्वाद घेतला आहे, असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना नासीर बागवान म्हणाले, मी गरिबीत जन्मलो, नशिबाने श्रीमंत झालो. मला गरिबांविषयी कळवळा आहे. मी निवडून आल्यास खानापूर तालुक्मयातील सर्व महिला स्व-साहाय्य संघांचे कर्ज स्वत: भरणार आहे. युवकांसाठी नवनवीन उद्योग स्थापणार आहे. तालुक्मयात मंदिरे बांधून देणार आहे. विकासाच्या बाबतीत तालुक्मयाचा कायापालट करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लक्ष्मीश्वर मुक्तीमठाचे विमल रेणुका वीरमुखी मुनी शिवाचार्य स्वामी, गंदिगवाड मठाचे मृत्युंजय स्वामी, निधर्मी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, अॅड. एच. एन. देसाई, दिलीप पवार, बसवप्रभू हिरेमठ, जि. पं माजी सदस्य विशाल पाटील आदींनी बागवान यांच्या कार्याची स्तुती करून विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. विविध संघ-संस्थांच्यावतीने बागवान यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत निधर्मी जनता दलाचे तालुकाध्यक्ष एम. एम. सावकार यांनी केले. प्रस्ताविक लायकली बिच्चुन्नावर यांनी केले.
भव्य मिरवणूक
येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मलप्रभा मैदानापर्यंत नासीर बागवान यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मलप्रभा मैदानावर रोपट्याला पाणी घालून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठल रखुमाईचे चित्र असलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सी. एम. इब्राहिम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्मयाच्या विविध भागातून हजारो लोक उपस्थित होते.
कीर्तन-लावणी कार्यक्रमाला मोठी उपस्थिती
सायंकाळी 6 वाजता ब्रह्मचैतन्य गुऊवर्य गोपाळदेव अण्णा तुकाराम वासकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी तालुक्मयातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नासीर बागवान यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पुणे येथील नामवंत कलाकारांकडून लावणीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही युवकांसह महिला व नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती.









