वार्ताहर /किणये
महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी तुरमुरी येथील महिलांची मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत माजी सदस्या माधुरी हेगडे होत्या. आर. एम. चौगुले यांना भरघोस मतदान करून निवडून आणण्याचा ठाम निर्धार यावेळी महिलांनी केला. ग्रामीण भागात विविध प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत. या आमिषांना कोणीही बळी पडू नका. कारण आपला सीमाप्रश्नाचा लढा महत्त्वाचा आहे. या सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी काही जणांनी प्राणांची आहुती दिली आहे. लाठ्या खाल्लेल्या आहेत, तुरुंगवासही भोगलेला आहे. या सर्वांनी केलेला त्याग आपण विसरून चालणार नाही. सीमाप्रश्नासाठी व आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना निवडून आणलेच पाहिजे, असे मनोगत तालुका पंचायत माजी सदस्या कमल मन्नोळकर यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. मधुरा गुरव, प्रकाश बेळगुंदकर आदींनी महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागेश बेळगावकर, अश्विनी बेळगावकर, शांता चलवेटकर, गायत्री जाधव, सुरेखा राजूकर, सुरेखा कलंबट, अश्विनी कलजीकर, गौरी जाधव, वंदना बांडगी, रेश्मा तंगणकर, सोनम बेळगावकर आदींसह महिला उपस्थित होत्या.
बहाद्दरवाडीत आज पदयात्रा
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारासाठी बहाद्दरवाडी गावच्या कार्यकर्त्यांच्यावतीने गुरुवार दि. 4 रोजी सायं. 7 वाजता गावमर्यादित प्रचार पदयात्रा काढण्यात येणार आहे. पश्चिम भागातील बहाद्दरवाडी गावातील म. ए. समितीला नेहमीच चांगले मतदान होते. आर. एम. चौगुले यांच्या ठिकठिकाणी होत असलेल्या प्रचारफेरीमध्ये गावातील कार्यकर्ते सहभागी होऊ लागले आहेत. बहाद्दरवाडी गावात जनजागृती करून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन गावातील समितीचे वरिष्ठ कार्यकर्ते, तरुण मंडळी व महिला यांच्यावतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे. गुरुवारी सायंकाळी गावातील समितीचे प्रमुख कार्यकर्ते व तरुणांच्यावतीने घरोघरी जाऊन समितीचा प्रचार करण्यात येणार आहे. या पदयात्रेत सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.









