मदतकार्य त्वरित हाती घेण्याचे जिल्हाधिकाऱयांचे आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथे अतिवृष्टीमुळे घर कोसळल्यामुळे घरातील दोन्ही महिलांना मोठे त्रास सोसावे लागले आहे. या घटनेची त्वरित दखल घेत जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासकांनी मनपा आयुक्तांना त्वरित मदत कार्य हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.
अतिपावसामुळे शहराच्या विविध भागातील जुन्या काळातील घरे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅम्पमध्ये आजगावकर व त्यांची बहीण यांच्या घराची मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे त्या घरात राहणे धोकादायक बनले आहे. तथापि त्यांना अन्यत्र जाण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने त्या धोकादायक घरातच रहात होत्या. बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस आणि महिला पोलिसांना घटनास्थळी जाऊन मदत कार्य हाती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस तेथे पोहचले. जिल्हाधिकारीही तेथे उपस्थित होते. महिला पोलिसांनी दोन्ही बहिणींची समजूत काढून त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. सध्या सरकारी निवारा केंद्रात त्यांची सोय केली आहे.









