वृत्तसंस्था/ हैदराबाद
इस्रायल अन् हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. भारतासह पाश्चिमात्य देश इस्रायलच्या बाजूने उभे आहेत. परंतु भारतातील अनेक नेते पॅलेस्टाइनचे समर्थन करत आहेत. या नेत्यांमध्ये एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांचे नाव देखील सामील आहे. इस्रायल-हमास युद्धावरून भाजपचे महासचिव आणि करीमनगरचे खासदार बंदी संजय कुमार यांनी काँग्रेस अन् एआयएमआयएमवर टीका केली आहे. हे दोन्ही पक्ष दहशतवाद्यांना बळ पुरवत असून हमास दहशतवाद्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप बंदी संजय कुमार यांनी मंगळवारी केला आहे.
हमासचे समर्थन करून काँग्रेस आणि एआयएमआयएम दोघेही दहशतवादाचे समर्थन करत आहेत. भारताला संपुआच्या काळात भयावह दहशतवादी हल्ल्यांना तोंड द्यावे लागले यात कुठलेच आश्चर्य नाही. काँग्रेस आणि एआयएमआयएम हे नेहमीच पीएफआय, दहशतवादी आणि रोहिंग्यांची बाजू उलचून धरणारे आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारताच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
इस्रायल-हमास संघर्षादरम्यान काँग्रेस कार्यकारिणीने सोमवारी पॅलेस्टिनी लोकांना भूमी, स्वशासन आणि सन्मानासह जगण्यासाठी समर्थन असल्याचे म्हटले आहे. तसेच दोन्ही बाजूंना तत्काळ युद्धविराम तसेच सर्व प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले होते.









