राहूल गांधी यांनी लोकसभेतील आपल्य़ा महिला खासदारांकडे बघून फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. या प्रकरणानंतर तीव्र पडसाद उमटले असून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्मृती इराणींच्या या आरोपावर आपली प्रतिक्रिया देताना स्मृती इराणी ह्या गांधी घराण्यावर गरळ ओकल्यामुळेच प्रसिद्धीच्या झोतात असल्याचे म्हटले आहे.
लोकसेभेतील आपले भाषण संपल्यावर सभागृहातून बाहेर पडताना महिला खासदारांकडे पाहून राहूल गांधी यांनी फ्लाईंस केल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केल्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी स्मृती इराणी यांच्यावर टिकास्त्र सोडले आपल्या ट्विटमध्ये लिहिताना त्या म्हणाल्या, “स्मृती इराणी या बाई देशाच्या विकासावर, त्यांच्या खात्याशी संबंधित ध्येयधोरणावर कमी आणि गांधी घराण्यावर गरळ ओकल्यामुळे जास्त प्रसिद्ध झोतात आल्या. प्रसिध्दी झोतात राहण्यासाठी आणि मणिपूरच्या चर्चा टाळण्यासाठी भाजपकडून चाललेला हा सगळा किळसवाणा प्रकार आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या आणखी एका ट्विटमध्ये मणिपूरसंदर्भात राहूल गांधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना, “मणिपूर मधील घटना म्हणजे भारतीय लोकशाही व्यवस्थेची हत्याच आहे. ही भारत मातेची विटंबनाच आहे. राहुल गांधी जे बोलले त्यात तीळ मात्र ही चूक नाही.” असे त्या म्हणाल्या.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव इंडिया या आघाडीने सादर केला आहे. या प्रस्तावावर काल राहूल गांधींचे बहुप्रतिक्षित भाषण झाले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच भाजपवर थेट आरोप करताना मणिपूरमध्ये हिंदुस्थानाची हत्या तसेच भारतमातेची हत्या केली जात असल्याचे म्हटले आहे.








