मराठी भाषिक पालकांची उदासीनता : निम्म्याहून अधिक मुले परप्रांतीय : नेपाळी मुलेही गिरवताहेत मराठीचे धडे
बेळगाव : मराठीचा अभिमान बाळगावा तर तो बेळगावकरांनीच, असे प्रत्येक बेळगावकर छातीठोकपणे सांगतो. कारण बेळगावकर मराठी भाषा आणि अस्मिता टिकविण्यासाठी मागील 68 वर्षांपासून लढा देत आहेत. हे एकीकडे असताना दुसरीकडे मात्र मराठी भाषा आणि संस्कृती जतन करणाऱ्या मराठी शाळांमधील चित्र धक्कादायक आहे. विशेषत: बेळगाव शहरातील शाळा या केवळ नेपाळी, बंगाली, गुजराती, युपी, बिहारच्या विद्यार्थ्यांवर चालल्या आहेत. त्यामुळे बेळगावमध्ये खरंच मराठीची आत्मियता राहिली आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव शहरात 70 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक आहेत, असे सांगितले जाते. परंतु मराठी प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत एकूण 15 ते 20 विद्यार्थी आहेत. ज्या बेळगावचे नाव मराठीशिवाय पूर्ण होत नाही, त्याच बेळगावमध्ये मराठीची ही दयनीय स्थिती पाहायला मिळत आहे. इंग्रजी शाळांच्या ओढ्यामुळे सरकारी मराठी शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील नानावाडी, महाद्वार रोड, गोवावेस, गणपत गल्ली, खासबाग, शहापूर, वडगाव, टिळकवाडी, व्हॅक्सिन डेपो, चव्हाट गल्ली, फुलबाग गल्ली, बकरी मंडई, माळी गल्ली या मराठी भागातील शाळांमध्ये 20 पटसंख्येपैकी 10 विद्यार्थी उत्तर भारतीय व नेपाळी आहेत. या विद्यार्थ्यांवरच मराठी शाळा तग धरून आहेत. त्यामुळे मराठी शाळा वाचविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परप्रांतीयांचा मराठीकडे ओढा
बेळगाव शहर टू टायर शहर म्हणून ओळखले जाते. अनेक उद्योग-व्यवसाय या ठिकाणी चालत असल्याने मोठ्या संख्येने उत्तर भारतीय शहरात कामानिमित्त येतात. उत्तर भारतातील राज्यांमध्ये देवनागरी लिपी असल्याने कन्नडपेक्षा त्यांचा मराठीकडे ओढा असतो. मराठी शाळांमध्ये देवनागरी लिपी असल्याने त्यांना लवकर शिकता येते. शहरातील पाणीपुरी, आइस्क्रीम, हॉटेल कामगार, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बेकरीतील कामगार, वॉचमन, गुरखा यांची मुले मराठीतून शिक्षण घेत आहेत. परप्रांतीय विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांचीही दमछाक होत आहे. विद्यार्थ्यांना देवनागरी लिपी येत असली मराठी समजत नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक कृती हिंदीतून सांगावी लागते. त्यामुळे मराठी व हिंदीमधून सांगण्याची कसरत शिक्षकांना करावी लागते. विद्यार्थ्यांना केवळ अंकांची ओळख झाली तरी बस, अशी प्रतिक्रिया परप्रांतीय पालकांनी दिली.
तालुक्यातीलही पटसंख्या घटतेय
इंग्रजी शाळांचे फॅड आता ग्रामीण भागातही वाढू लागले आहे. ज्या गावात परिवहन मंडळांच्या बस जात नाहीत, अशा गावांमध्ये इंग्रजी शाळांच्या बस पोहचत आहेत. यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी शाळांमध्ये दाखल होत आहेत. याचा परिणाम बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. अशीच स्थिती राहिल्यास ग्रामीण भागातील मराठी शाळाही बंद कराव्या लागतील. मध्यंतरीच्या काळात मराठी भाषिक विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या मिळत नसल्याने पालकांनी कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना घालण्यास सुरुवात केली. यामुळे शहरातील मराठी भागातील विद्यार्थीही कन्नड माध्यमातूनच शिकू लागले. विशेषत: वडगाव, शहापूर भागातील बरेचसे विद्यार्थी कन्नड माध्यमातून शिकल्याने मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत गेली. परंतु, मराठीबरोबरच कन्नड भाषिक पालकांनीही आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये दाखल केल्याने कन्नड माध्यमाच्या शाळांमध्येही हीच परिस्थिती दिसून येत आहे.
विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी धडपड
काही शिक्षकांच्या हलगर्जापणामुळे सरकारी शाळांचा दर्जा कमी ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु काही शिक्षक मात्र विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. शहरातील काही शिक्षकांनी दूरवरच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या खिशातील रक्कम खर्च करून रिक्षा सुरू केल्या आहेत. काही शिक्षक स्वत:च्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणत आहेत. शाळेतील पटसंख्या कमी झाल्यास शाळा बंद होणार आणि आपसुकच त्याचा परिणाम शिक्षकांच्या नोकरीवर होणार याची जाण त्यांना आहे.
मराठी शाळांतून गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न
मराठी शाळांतील पटसंख्येत होणारी घट ही खेदाची बाब आहे. मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढीसोबतच शिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी मागील पाच वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. बेळगाव, खानापूर व निपाणी परिसरातील 180 हून अधिक मराठी शाळांमधील 5 हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. तसेच ज्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीत, त्यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत. आदर्श शाळा उपक्रम राबवून शाळांमधील गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– अंकुश केसरकर (अध्यक्ष, म. ए. युवा समिती)









