अॅड. अमर येळ्ळूरकर यांना विजयी करण्याचे आवाहन : आमदार रोहित पाटील यांचे मार्गदर्शन

बेळगाव : मराठी अस्मिता, मराठी भाषा जपण्यासाठी म. ए. समितीने चालविलेली चळवळ कोणीच संपवू शकत नाही. तुमच्यासारख्या माता-भगिनींचे पाठबळ म. ए. समितीला मिळाले तर विधानसभेत आपला आवाज नक्कीच घुमेल. ही चळवळ पुढे नेण्यासाठी म. ए. समितीच्या उमेदवाराला निवडून देणे काळाची गरज आहे. त्यामुळे मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनांनी अॅड. अमर येळ्ळूरकर यांना निवडून देण्यासाठी घागर या चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करावे, असे आवाहन आमदार रोहित पाटील यांनी केले. उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी लोकमान्य रंगमंदिरात महिला मेळावा आयोजिला होता. यावेळी रोहित पाटील बोलत होते. माजी महापौर व आजी-माजी नगरसेविकांच्यावतीने दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्ष व माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांनी प्रास्ताविक करून अॅड. येळ्ळूरकर यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच उत्तर मतदारसंघात म. ए. समितीच्या उमेदवाराला निवडून आणणे काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय पक्षांमुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या माणसाला निवडून देण्याची गरज आहे. सर्व मतदारांनी आपले बहुमोल मतदान म. ए. समितीला करण्यासाठी घागर या चिन्हासमोरील बटण दाबून येळ्ळूरकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले. य् ाावेळी प्रमुख अतिथी माधुरी गुरव, प्रकाश मरगाळे, म. ए. समिती युवा आघाडीचे शुभम शेळके, माजी महापौर सरिता पाटील, माजी महापौर संज्योत बांदेकर, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, माजी उपमहापौर रेणु मुतकेकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी नगरसेविका वैशाली हुलजी, मीनाक्षी चिगरे, किशोरी कुरणे, माया कडोलकर, शीतल कंगनाळकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आज घेणार विजयनगरमधील मतदारांच्या गाठीभेटी
उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, हजारो नागरिकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त करून निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. आपला विजय खेचून आणण्यासाठी मंगळवार दि. 2 मे रोजी विजयनगर, विनायकनगर अशा विविध भागात मतदारांची भेट घेणार आहेत. विजयनगर येथील प्रचारफेरीला सकाळी 8 वा. प्रारंभ करण्यात येणार असून यावेळी विनायकनगर, बुडा स्कीम नं. 51, रेलनगर, सदाशिवनगर अशा विविध परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 वा. कणबर्गी आणि रामतीर्थनगर परिसरातील मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे.









