निरंजन हिरेमठ यांचे आवाहन : मंत्री हेब्बाळकरांचे मानले आभार
बेळगाव : हुबळी येथे महाविद्यालय आवारात हत्या करण्यात आलेल्या नेहा हिरेमठ यांचे वडील निरंजन हिरेमठ यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी वचन पाळले आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटले असून लोकसभेमध्येही यावर आवाज उठविणे गरजेचे आहे. यासाठी या निवडणुकीत बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. निरंजन हिरेमठ हे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आपल्या मुलीची हत्या झाल्याची घटना समजताच मंत्री हेब्बाळकर यांनी तातडीने आपल्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. घटनेच्या तपासासाठी व चौकशीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कायदा मंत्री यांच्याशी संवाद साधून तपासाला गती दिली आहे.
नेहा आपली मुलगी समजून तिला न्याय देण्यासाठी त्यांनी तातडीने प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांची कृतज्ञता मानणे आपले कर्तव्य आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी नि:पक्षपाती मनोभाव ठेऊन नेहाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली आहेत. सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, एबीव्हीपी, अंजुम समाज संघटना, राजकीय नेत्यांनी या घटनेचे खंडन करून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. प्रसार माध्यमांनीही साथ दिली आहे. याबद्दल त्या सर्वांचे आपण कृतज्ञ आहोत, असे त्यांनी सांगितले. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या पाठीशी राहून समर्थ साथ दिली. मृणाल हेब्बाळकर लोकसभा निवडणुकीत उमेदवार असून या घटनेचा लोकसभेत आवाज उठविणे गरजेचे आहे. यासाठी मतदारांनी त्यांना आशीर्वाद द्यावा. कोणत्याही पक्षाकडून या घटनेचे राजकारण होऊ नये, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व नगरसेवकही असल्यामुळे त्यांच्या पाठीशी राहणे आपले कर्तव्य आहे. आपण दु:खात असताना केंद्रीय मंत्री आपल्या घरी आले असता न्यायाची मागणी केली होती. त्यांच्यासमोर दु:ख व्यक्त केले होते. मात्र या विषयावर राजकारण होऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली.









