डॉ. अंजली निंबाळकर यांचे लोंढा येथील सभेत आवाहन
खानापूर : सत्तेवर असलेल्या भाजपने गेल्या पाच वर्षांत खानापूर तालुक्याच्या मूलभूत रचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून समस्या सोडविण्यासाठी कायम अडथळा आणला. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अनेकवेळा आडमुठे धोरण राबवून मला अडविण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. मात्र मी घाणेरड्या राजकारणापेक्षा तालुक्याच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले. यामुळेच तालुक्यातील विकासकामाने विरोधकांना चोख उत्तर दिलेले आहे. यावेळीसुद्धा जनतेने मला तालुक्याच्या विकासासाठी साथ द्यावी, असे आवाहन आमदार अंजली निंबाळकर यांनी लोंढा येथील सभेत केले. लोंढा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भव्य प्रचाररॅली काढली. यावेळी आमदार अंजली निंबाळकर कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. आमदार अंजली निंबाळकर पुढे म्हणाल्या, काँग्रेस सत्तेवर आल्यास महिलांच्या सबलीकरणासाठी ठोस योजना लागू करण्यात येणार आहे. तसेच सामान्य जनता महागाईमुळे भरडली जात आहे. यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. सामान्य जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी काँग्रेसने विविध गॅरंटी जाहीर केल्या आहेत. त्याची पूर्तता केली जाणार आहे. विरोधक माझ्या विरोधात प्रचार करत मत मागत आहेत. विरोधकांकडे तालुक्यासाठी कोणतेच विकासाचे व्हिजन नाही. तालुक्याच्या विकासाची ध्येयपूर्ती साकार करण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा मला संधी देण्याची विनंती केली. लेंढ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी या भागात उद्योग निर्मिती करण्यासाठी निश्चित प्रामाणिक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार अंजली निंबाळकर यांनी लोंढावासियांना दिली. काँग्रेसचे युवा नेते बेन्नी पिंटो यांनी लोंढावासियांकडून यावेळीही काँग्रेसला निश्चित मतांची आघाडी दिली जाईल, असे ठोस आश्वासन दिले. यावेळी लोंढ्यातील तरुण, महिला व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आमदार अंजली निंबाळकर यांचे जल्लोषी स्वागत करत रॅली काढली. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा शेरवीन डायस, समीरखान जादे, मिलाग्रीज डिसोजा, दौलत खानजादे, सिरीयल डिसोजा, मोतेश सोज, रेष्मा पठाण, संतोष मिनेजीस, संजू आंबेडकर, लक्ष्मण नायक यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









