सांगली / संजय गायकवाड :
उद्योजकांना खेळते भांडवल आणि नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी बिनाजामीन व विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून सांगली जिल्हयातील ८१ हजार ६९८ नवउद्योजकांना कर्जपुरवठा करण्यात आला आहे. मार्च २०२५ अखेर जिल्हयात १२१४ कोटींचे कर्ज मुद्रा योजनेतून देण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मुद्रामधून २९४ कोटीचे जादा कर्जवाटप करण्यात आले आहे. मुद्राची कर्जे देण्यात राष्ट्रीयकृत बँकांची आघाडी कायम आहे.
मुद्रामधून शिशु किशोर व तरूण अशा तीन प्रकारची कर्जे दिली जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाच्यावतीने २०१६ पासून मुद्रा कर्ज योजनेचा प्रारंभ करण्यात आला. विशेषतः छोटे मोठे व्यावसायिक, कारागीर, हस्तकला व्याबसायिक, पार्लर व्यावसायिक, लघु व्यावसायिक, यंत्रकारागीर, बाहन दुरूस्ती करणारे कारागीर अशा छोटया मोठ्या व्यावसायिकांना खेळते भांडवल तसेच नव्याने छोटे मोठे ब्यबसाय करू इच्छिणाऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय आणि जामीनाशिवाय ५० हजारापासून दहा लाखापर्यंतची कर्ज मुद्रा योजनेतून दिली जातात. मुद्रा योजनेची कर्ज मर्यादा काही दिवसापुर्वीच २० लाख इतकी करण्यात आली आहे. काही बँका सिबील स्कोअर आणि काही तरी जामीनाची मागणी करतात. तसेच मुद्रा कर्ज योजनेच्या थकबाकीचाही आकडा वाढत चालला आहे. पण या बाबीमुळे नवउद्योजकांची कर्जाच्या बाबतीत अडवणूक होवू नये यासाठी राष्ट्रीयकृत, खासगी व स्मॉल फायनान्स बँकांकडून मुद्राची जास्तीत जास्त कर्ज मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीयकृत, खासगी व स्मों ल फायनान्स अशा ४३ बँकांकडून जिल्हयात मार्च २०२५ अखेर ८१ हजार ६९८ जणांना १२१४.६२ कोटीचे मुद्रा योजनेतून कर्जवाटप करण्यात आले आहे.
- राष्ट्रीयकृत बँकांची आघाडी
मुद्रा योजनेतून कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँकांची आघाडी कायम असून १२ राष्ट्रीयकृत बँकांनी शिशु, किशोर व तरूण अशा तिन्ही प्रकारामध्ये १६ हजार ७९८ लोकांना ७१४ कोटीचे कर्जवाटप केले. यात बँक ऑफ इंडियाकडून सर्वाधिक ६४३० लोकांना मुद्राची कर्जे दिली आहेत. त्यापाठोपाठ स्टेट बँक ५३१९, युनियन बैंक १८२८, बैंक ऑफ महाराष्ट्र १००४, कॅनरा बँक ५५१ व सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ३०० जणांना मुद्राची कर्जे दिली आहेत. खासगी व व्यापारी बँकामध्ये इंडसइंड बँकेने सर्वाधिक म्हणजे २८ हजार ९१४ त्याखालोखाल आयसीआयसी बैंक २४४३, एचडीएफसी बँक १७४८ आयडीएफसी बँक ५८० व आयडीबीआय ५७६ लोकांना मुद्राची कर्जे दिली आहेत.
तर स्मॉल फायनान्स बँकामध्ये एक्वॉटस स्मॉल फायनान्स बैंक ५४४६, ए. यू स्मॉल फायनान्स बँक ४११०, उज्चैन्न स्मॉल फायनान्स बँक २९६७, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक ८८३ व जना स्मॉल फायनान्स बँकेने ८४६ तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ८८ जणांना मुद्रामधुन कर्जवाटप केले आहे.








