दहशतवाद जगाचा शत्रू : अमिरातीचे स्पष्ट वक्तव्य, भारताच्या जागतिक संपर्काला उत्कट प्रतिसाद
वृत्तसंस्था /टोकिओ
जगासमोर पाकिस्तान आणि त्याचे दहशतवादाला असलेले समर्थन यांना उघडे पाडण्यासाठी भारताने आपल्या ‘जागतिक संपर्क’ अभियानाचा प्रारंभ केला आहे. भारताच्या संसद सदस्यांच्या दोन शिष्टमंडळांनी जपान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांशी या विषयावर चर्चा केली असून दोन्ही देशांनी भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे. दहशतवाद हा साऱ्या जगाचा शत्रू असून त्याच्या विरोधातल्या संघर्षामध्ये आम्ही भारताच्या समवेत आहोत, अशी स्पष्टोक्ती जपान आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांनी केली आहे. या जागतिक अभियानासाठी भारताने आपल्या सर्वपक्षीय संसद सदस्यांची सात शिष्टमंडळे सज्ज केली आहेत. त्यांच्यापैकी दोन शिष्टमंडळांनी गुरुवारी या अभियानाचा शुभारंभ केला. संयुक्त अरब अमिरातीला गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे करीत आहेत. तर जपानला गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा हे करीत आहेत.
अमिरातीची चर्चा
श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ प्रशासकांची भेट घेतली. त्यांनी या प्रशासकांना भारताच्या या जागतिक अभियानाची माहिती दिली. भारताने शांततेने राहण्याचा प्रयत्न केला असूनही शेजारचा देश भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे. त्यामुळे भारताला आपल्या संरक्षणासाठी योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार प्राप्त होत आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाने आणि सैन्यदलांनी दहशतवादाला पोसणे थांबवावे, यासाठी त्याच्यावर विश्व समुदायाकडून दबाव आणला जाण्याची आवश्यकता आहे, अशी भारताची भूमिका असल्याचे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
जपानचे भारताला समर्थन
भारताने दहशतवादाविरोधात जे जागतिक अभियान हाती घेतले आहे, त्याला जपानचे पूर्ण समर्थन आहे, असे त्या देशाने स्पष्ट केले आहे. जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ताकेशी इवाया यांनी संजय झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची भेट घेतली. भारताच्या दहशतवादाविरोधातील संघर्षात आम्ही तुमच्यासह आहोत, असा संदेश त्यांनी शिष्टमंडळाला दिला. संजय झा यांनी भारताच्या या अभियानाची सविस्तर माहिती ताकेशी इयावा आणि वरिष्ठ प्रशासकांना गुरुवारी दिली.
कोणत्या शिष्टमंडळात कोणते सदस्य…
श्रीकांत शिंदे शिष्टमंडळ – बांसुरी स्वराज आणि अतुल गर्ग (भाजप), मनन कुमार मिश्रा (राज्यसभा सदस्य), मोहम्मद बशीर (मुस्लीम लीग), सस्मित पात्रा (बिजू जनता दल), सुजन चिनॉय (माजी मुत्सद्दी) आणि भारतीय जनता पक्षाचे नेते एस. एस. अहलुवालिया यांचा शिष्टमंडळात समावेश,संजय झा शिष्टमंडळ – डॉ. हेमांग जोशी, अपराजिता सारंगी, ब्रिज लाल आणि प्रधान बारुआ (भारतीय जनता पक्ष), मोहन कुमार (राजदूत), जॉन ब्रिटास (सीपीआयएम) आणि अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस) यांचा समावेश.
अभियान कशासाठी…
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक आघाड्या उघडल्या आहेत. जागतिक स्तरावर पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठीचे हे अभियान हा भारताच्या दहशतवादाविरोधातील धोरणाचा एक भाग आहे. भारताने पाकिस्तानला सशस्त्र संघर्षात तर वाकवले आहेच. तसेच आता मुत्सद्देगिरीच्या संघर्षातही पाकिस्तानची नाचक्की करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अशाप्रकारे, पाकिस्तानची कोंडी करण्याची भारताची योजना आहे.









