डॉ. आंबेडकर उद्यानात समाजातर्फे लाक्षणिक उपोषण
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे उपोषण केले जाणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये उपोषण करून जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला बेळगावमधून पाठिंबा देण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला देशभरातील मराठा समाजाकडून पाठिंबा दर्शविला जात आहे. महाराष्ट्राच्या नेहमीच पाठीशी असणाऱ्या बेळगावमधील मराठा समाजानेदेखील आपला पाठिंबा दर्शवत लाक्षणिक उपोषण केले. मराठा समाज हा शेती तसेच पूरक व्यवसायांवर अवलंबून असणारा समाज आहे. त्यामुळे या समाजाची आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या प्रगती झालेली नाही. यासाठी आरक्षण महत्त्वाचे असल्याने ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाचे संयोजक रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी उद्यान परिसर दणाणून निघाला. यावेळी मराठा समाजातील दिग्गजांनी मार्गदर्शन करत आरक्षण का महत्त्वाचे आहे? हे स्पष्ट केले. यावेळी रणजित चव्हाण-पाटील, महादेव पाटील, शिवाजी सुंठकर, शंकर बाबली, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, धनंजय पाटील, अंकुश केसरकर यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दलित समाजाचाही पाठिंबा
महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांनी मराठा व दलित या दोन्ही समाजांना एकत्र आणण्याचे काम केले. तोच धागा पकडत बेळगावमधील दलित संघटनांनी लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्यासोबतच मराठा आरक्षणालाही पाठिंबा दर्शविला. नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असणाऱ्या मराठा समाजाच्या न्याय्यहक्कांसाठी दलित समाज कायम सोबत असेल, असे आश्वासनही दलित समाजाच्या नेत्यांनी दिले. यावेळी मल्लेश चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, नागाप्पा कोलकार, संतोष कांबळे यासह इतर उपस्थित होते.









