कराड :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी लाखो मराठा बांधव राजधानी मुंबईत धडकले आहेत. परंतु, आपल्याला मुंबईला जाता आले नाही, म्हणून कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड गावाने बाजारपेठ बंद ठेवून जरांगे-पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला.
मुंबईत जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी वसंतगड गावची बाजारपेठ बंद ठेवून संपूर्ण गावाने उपोषणाला पाठिंबा दर्शविला. ऐन गणेशोत्सवात बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. किल्ले वसंतगडाचे जुने गावठाण गडाच्या पायथ्याला आहे. मात्र, बऱ्याच वर्षांपासून गावची बाजारपेठ गुहागर-विजापूर महामार्गालगत वसली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. तरीही फायद्या-तोट्याचा विचार न करता सामाजिक दायित्व म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी व्यवसाय बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला. आजूबाजूच्या गावातील लोकांनी वसंतगडकरांच्या निर्णयाचे कौतुक केले.








