नागेश मनोळकर : गणेशपूर परिसरात जाहीर पाठिंबा
वार्ताहर /हिंडलगा
देशातील नरेंद्र मोदी सरकारने विकास काय आहे? हे आपल्या कामातून दाखवून दिले आहे. प्रत्येक वंचित समाजाच्या विकासासाठी भाजपने विविध योजना लागू करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. भ्रष्टाचारावर आळा घालून उद्योग निर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. तर देश विघातक संघटनांना रोखून हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी तत्पर आहे. त्यामुळे बेळगाव ग्रामीण मतदार संघाचा विकास देखील भाजपमुळेच शक्य असून, काँग्रेसच्या भेटवस्तू किंवा पैशांच्या अमिषाला बळी न पडता विकासाला प्राधान्य देण्यासाठी मला आपले बहुमोल मत देऊन निवडून द्यावे, असे आवाहन उमेदवार नागेश मनोळकर यांनी केले. सोमवार दि. 8 रोजी गणेशपुर परिसरात भाजप उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. याप्रसंगी ते मतदारांना उद्देशून बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीमुळे बेळगाव ग्रामीण मतदार संघाचा विकास खुंटला आहे. प्रत्येक गावामध्ये अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. येत्या काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. शिवाय गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ व रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे. तरी नागरिकांनी यावेळी विकासासाठी भाजपला साथ देण्याची गरज आहे. प्रचार फेरी दरम्यान मनोळकर यांचे महिला वर्गाने ठीक ठिकाणी औक्षण करुन स्वागत केले. तर परिसरातील विविध युवक मंडळे व महिला मंडळाच्या सदस्यांनी मनोळकर यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करत प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









