राज्य रयत संघटनेचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : जिल्ह्यात युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. शेतकऱ्यांवर त्याचा मोठा परिणाम होत असून, पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. युरियाची कमतरता असल्यामुळे पिकांना मुबलक प्रमाणात नायट्रोजन मिळत नसल्याने पिके नष्ट होत आहेत. यासाठी शहर परिसरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर युरियाचा पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य रयत संघटना व हरित सेनेच्यावतीने देण्यात आला. शेतकरी नेते राजू मरवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यंदाच्या खरिप हंगामात शेतकऱ्यांनी योग्यरित्या मशागती केली नव्हती. यातच मे महिन्यापासून मोठा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरण्या उरकून घेतल्या. यानंतर अतिवृष्टी झाल्याने शिवारात पाणीचपाणी झाले होते. बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. परिणामी पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. प्रसंगी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्यानंतर खतांची आवश्यकता असताना राज्यात युरियाचा तुटवडा झाला आहे.
युरियाचा पुरवठा करून दिलासा द्या
शेत जमिनीत नायट्रोजन संतुलित राखणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी पिकांची वाढ होण्यासाठी युरियाचा वापर करतात. यानंतर शेणखतासह इतर खतेही पिकांना दिले होते, पण ऐनवेळी पुन्हा अतिवृष्टी झाल्याने याचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना युरियाची अत्यावश्यकता आहे. तेव्हा कृषी खात्याने लागलीच बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा करून दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करून, सरकारला जागे केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला.









