बेळगाव : हवामानातील बदलामुळे अनेक संसर्गजन्य आजार वाढले असताना शहरात अशुद्ध पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील आठ दिवसांपासून ज्ञानेश्वरनगर, येळ्ळूर रोड, वडगाव परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या पाण्यामुळे परिसरातील अनेक जण आजारी असून एलअँडटीने तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
शहराच्या बऱ्याचशा भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार केली जात होती. चव्हाट गल्ली, भडकल गल्ली, काकतीवेस, शास्त्राrनगर या परिसरात मागील पंधरा दिवसात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात होता. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यात आले. शहरात सध्या सर्वत्र एलअँडटीकडून जलवाहिन्यांसाठी खोदाई केली जात आहे. त्यामुळे अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
ज्ञानेश्वरनगर व आसपासच्या भागामध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला. जवळपास पाण्याचा इतर स्रोत नसल्यामुळे नागरिकांना याच पाण्यावर अवलंबून रहावे लागते.अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे पैसे खर्च करून टँकर मागवावे लागत आहेत. याची दखल घेऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.









