दोन्ही देशांमधील विश्वास वाढणार असे वक्तव्य
वृत्तसंस्था / काबूल
भारताने इराणमधील चाबहार बंदराद्वारे अफगाणिस्तानला मानवीय साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. चाबहार बंदराचा वापर अफगाणिस्तानला साहाय्य पाठविण्यासाठी केला जाणार आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यावर पहिल्यांदाच भारत या मार्गाद्वारे मदत पाठविणार आहे. भारताच्या या निर्णयाचे तालिबानने स्वागत केले आहे. अशाप्रकारचे पाऊल दोन्ही देशांदरम्यान विश्वास वाढविणार असल्याचे तालिबानने म्हटले आहे. भारत 20 हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पुरविणार आहे.
सद्यकाळात अफगाणिस्तानात मानवीय संकट आहे. ही स्थिती दूर करण्यासाठी भारत चाबहार बंदराच्या माध्यमातून अफगाणी लोकांसाठी 20 हजार मेट्रिक टन गव्हाचा पुरवठा करणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे. भारताने यापूर्वी 2020 मध्ये अफगाणिस्तानला मानवीय मदत म्हणून 75 हजार मेट्रिक टन गहू चाबहार बंदराद्वारे पाठविला होता.
तालिबानने गव्हाच्या पुरवठय़ाप्रकरणी भारताचे आभार मानले आहेत. चाबहार बंदराच्या माध्यमातून अफगाण लोकांसाठी 20 हजार मेट्रिक टन गहू पुरविण्याच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो. अशाप्रकारच्या मानवीय पावलामुळे दोन्ही देशांमधील विश्वास वृद्धींगत होतो आणि यातून परस्पर संबंध सकारात्मक होत असल्याचे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी म्हटले आहे. भारताने मागील वर्षी देखील अफगाणिस्तानच्या लोकांसाठी मानवीय मदत पाठविली होती.
भारताने मागील वर्षी 40 हजार मेट्रिक टन गहू, 50 टन औषधे, 5 लाख कोरोना लसीचे डोस, हिवाळय़ासाठी उबदार कपडे आणि 28 टन मदतसामग्री पाठविली होती. तेव्हा ही सामग्री पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानात पोहोचली होती. अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला अद्याप भारताने मान्यता दिलेली नाही. तरीही भारताकडून भरीव मदत करण्यात येत आहे. तालिबानसोबत पडद्याआड चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते. जून 2022 मध्ये भारताचे एक पथक काबूलमध्ये पाठविण्यात आले होते.









