शेजारी देशाने मानले भारताचे आभार
वृत्तसंस्था / कोलंबो
भारताने सोमवारी एका विशेष सहाय्य कार्यक्रमाच्या अंतर्गत श्रीलंकेला 21 हजार टन इतक्या युरिया खताचा पुरवठा केला आहे. भारताच्या या पुढाकारामुळे श्रीलंकेच्या शेतकऱयांना मोठी मदत मिळणार असून दोन्ही देशांमधील संबंध मजबूत होणार आहेत. संकटग्रस्त श्रीलंकेला भारताकडून दुसऱयांदा खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.
मैत्री अन् सहकार्याचे संबंध वृद्धींगत करण्यात येत आहेत. भारताच्या विशेष समर्थनाच्या अंतर्गत औपचारिक स्वरुपात श्रीलंकेच्या लोकांना 21 हजार टन इतके खत पुरविण्यात आले आहे. यापूर्वी मागील महिन्यात 44 हजार टन खतांचा पुरवठा करण्यात आला होता. भारताकडून एकूण 4 अब्ज डॉलर्सच्या मदतनिधी अंतर्गत हा पुरवठा करण्यात आल्याचे भारतीय दूतावासाने ट्विट करत म्हटले आहे.
खतांच्या पुरवठय़ामुळे अन्नसुरक्षेला चालना मिळणार आहे तर श्रीलंकेच्या शेतकऱयांना मदत होणार आहे. हे पाऊल भारतासोबतचे घनिष्ठ संबंध तसेच दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास अन् सद्भावना दर्शविणारे असल्याचे दूतावासाने नमूद केले आहे.
श्रीलंका सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाला तोंड देत असल्याने तेथे इंधन अन् इतर आवश्यक सामग्रीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भारत श्रीलंकेला सातत्याने मदत करत आहे. इंधन, अन्नधान्य तसेच खतांचा पुरवठा करून श्रीलंकेच्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.









