पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर सुरळीत : पुरवणी परीक्षेचेही वेबकास्टिंग, कोणताही गैरप्रकार नाही
बेळगाव : दहावी मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुरवणी परीक्षा-2 घेण्यात येत आहे. शुक्रवारपासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 33 परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर सुरळीतपणे पार पडला.मागील परीक्षेप्रमाणेच सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने कोणताही गैरप्रकार घडला नाही. बारावी परीक्षेप्रमाणेच यावर्षी दहावी मुख्य परीक्षेत पहिल्यांदाच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले. केवळ सीसीटीव्हीच न बसविता त्यांचे वेबकास्टिंग थेट जिल्हा पंचायत कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यामुळे कॉपीला आळा बसला. परंतु अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली.
बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 24 हजारांहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. त्यामुळे पुरवणी परीक्षा केव्हा होणार याची विद्यार्थी वाट पाहत होते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 11 हजार 65 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी बेळगाव शहरासह परिसरातील परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रथम भाषा पेपर असलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला. याबरोबरच इतर माध्यमांचे पेपर झाले. परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथकांची व्यवस्था शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. मुख्य परीक्षेप्रमाणेच पुरवणी परीक्षेचेही वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण तालुका पातळीवरील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात व जिल्हा पंचायत कार्यालयांमध्ये करण्यात येत आहे.
पहिल्याच दिवशी 501 विद्यार्थ्यांची दांडी
पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर झाला. प्रथम भाषा पेपरसाठी 6918 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 6417 विद्यार्थी परीक्षेला हजर होते. उर्वरित 501 विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशीच्या पेपरला दांडी मारली.









