अर्ध्या तासाचा वेळ ; त्यात रंगपंचमीचा खेळ : सकाळी एसएसएलसी तर दुपारच्या सत्रात मूल्यांकन परीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
दहावी व मूल्यांकन परीक्षा एकाचवेळी आल्याने शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सकाळच्या सत्रात दहावी तर दुपारच्या सत्रात पाचवी, आठवी व नववी इयत्तांच्या मूल्यांकन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. दोन्ही ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने केवळ अर्ध्या तासात दुसऱ्या परीक्षा केंद्रावर पोहोचून शिक्षकांना मूल्यांकन परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
सोमवार दि. 25 मार्चपासून एसएसएलसी परीक्षेला सुरुवात होत आहे. तर रखडलेली मूल्यांकन परीक्षाही सोमवारपासून सुरू होणार आहे. सोमवार दि. 11 मार्चपासून सुरू झालेल्या मूल्यांकन परीक्षेला न्यायालयाने स्थगिती दिल्याने परीक्षा रखडली होती. दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्याने सोमवारपासून राहिलेल्या विषयांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
शिक्षकांची तारेवरची कसरत
सोमवारी व बुधवारी सकाळच्या सत्रात एसएसएलसी तर दुपारच्या सत्रात मूल्यांकन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सकाळी 10.15 ते 1.30 या वेळेत दहावी पेपरचे पर्यवेक्षण करून शिक्षकांना सर्व पेपर केंद्र प्रमुखांकडे जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर अर्ध्या तासात मूल्यांकन परीक्षेसाठी दुसऱ्या शाळेवर हजर व्हावे लागणार आहे. बऱ्याच शिक्षकांना दूरवरच्या शाळांवर पर्यवेक्षक पदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
वयोवृद्ध शिक्षकांमधून नाराजी
सोमवारी शहरात रंगपंचमी असल्याने दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत रंगपंचमीचा उत्साह सुरू असतो. यामध्ये दहावीचा पेपर संपवून पुन्हा मूल्यांकन परीक्षेसाठी शिक्षकांना दुसरी शाळा गाठावी लागणार असल्याने वयोवृद्ध शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. परंतु, 10 एप्रिलपूर्वी परीक्षांचा निकाल लावण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याने परीक्षेवर ठाम आहे.









