वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिअल इस्टेट कंपनी सुपरटेक लिमिटेड दिल्ली-एनसीआरमधील 18 निवासी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 1,600 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आरके अरोरा यांनी ही माहिती दिली आहे.
ही रक्कम उभी करण्यासाठी कंपनीने गुंतवणूकदारांशी प्रारंभिक करार केला असल्याचे अरोरा यांनी सांगितले. सध्याला प्राथमिक टप्प्यातील तयारी सुरु आहे. मात्र, त्यांनी गुंतवणूकदारांची नावे उघड केलेली नाहीत.
अरोरा यांनी सांगितले, आम्हाला अलीकडेच विद्यमान प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांच्या सदनिका सुपूर्द करण्याच्या उद्देशाने अंतरिम वित्तपुरवठा वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाली आहे. या निर्णयानंतरच कंपनी रक्कम उभारणीच्या कामाला लागली आहे. जुलै अखेरपर्यंत 1,600 कोटी रुपये उभारणार अशी अपेक्षा आहे. यावेळी अरोरा म्हणाले की, सुपरटेक लिमिटेड अंतर्गत 18 निवासी प्रकल्प सुरू आहेत, ज्यात 50,000 फ्लॅट्स आहेत. आम्ही आमच्या ग्राहकांना 17,000 फ्लॅट्स सुपूर्द केले आहेत. येत्या दोन वर्षांत हे फ्लॅट हस्तांतरित करण्याची आमची योजना आहे. हे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 3,000 कोटी रुपयांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.









