अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेला खतपाणी
बेळगाव : अमावस्या, पौर्णिमा जवळ आल्या की, रस्त्यावर उतारे ठेवण्याचे प्रकार वाढतात. अनसूरकर गल्ली येथील एका दुकानासमोर कोहळा व इतर उतारा ठेवल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. उतारा ठेवणाऱ्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ऑटोरिक्षातून चेहरा झाकून घेतलेला एक तरुण येतो. दुकानापासून थोड्या अंतरावर जाऊन आपली रिक्षा उभी करतो. उतारा असलेली बुट्टी घेऊन दुकानासमोर येतो. शटरला लागूनच सर्व उतारा ठेवून तो आपल्या रिक्षाच्या दिशेने निघून जातो.
नेहमीप्रमाणे दुकानदार दुकान उघडण्यासाठी आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली आहे. त्यावेळी दुकानदारांना धक्का बसला आहे. ऑटोरिक्षातून येऊन उतारा ठेवणारा कोण? याचा उलगडा झाला नसला तरी त्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यासंबंधी खडेबाजार पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. उतारा ठेवण्यासाठी आलेल्या इसमाने आपली ओळख लपवण्यासाठी चेहरा झाकून घेतला होता. त्याने आपल्या अंगावर खाकी कपडे परिधान केले होते. कॅरीबॅगमधून उतारा असलेली बुट्टी घेऊन तो आला होता. त्या बुट्टीत कोहळा, काळी बाहुली, लिंबू आदी साहित्य होते.









