टोकियो ऑलिम्पिकनंतर पहिल्याच स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा सुपरस्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकनंतर पहिल्याच व्यावसायिक पुनरागमनात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. फिनलंडमधील तुर्पू येथे एकापेक्षा एक स्टार भालाफेकपटूंचा समावेश असलेल्या पाओ नूर्मी गेम्समध्ये त्याने 89.30 मीटर्सची लक्षवेधी फेक करत स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. शिवाय, या स्पर्धेत रौप्यपदकही जिंकले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्ण जिंकणाऱया 24 वर्षीय चोप्राने येथे 10 महिन्यांच्या कालावधीनंतर अगदी थाटात आपले पुनरागमन नोंदवले. चोप्राने यापूर्वी गतवर्षी पतियाळात 88.07 मीटर्सचा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. तो त्याने येथे मोडीत काढला. यापूर्वी दि. 7 ऑगस्ट 2021 रोजी त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर्सची फेक करत सुवर्णवेध घेतला होता.
भारतीय प्रमाणवेळेनुसार, मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या स्पर्धेत चोप्राने 86.92 मीटर्सची पहिली फेक नोंदवली. त्यानंतर 89.30 मीटर्सचा नव्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर पुढील तीन अटेम्प्ट फेल गेले आणि सहाव्या व शेवटच्या थ्रोमध्ये त्याने 85.85 मीटर्स फेक नोंदवली. फिनलंडचा 25 वर्षीय ऍथलिट ऑलिव्हर हेलँडर आश्चर्यकारकरित्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने दुसऱया प्रयत्नानील 89.83 मीटर्स फेकीसह सुवर्ण जिंकले. आश्चर्य म्हणजे हेलँडरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 88.02 मीटर्स व हंगामातील सर्वोत्तम कामगिरी 80.36 मीटर्स इतकीच होती.
चोप्रा 89.30 मीटर्स फेक करु शकल्याने जागतिक स्तरावरील हंगामातील सर्वोत्तम कामगिरीच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचू शकला आहे. ग्रेनाडाचा विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्स 86.60 मीटर्स फेकीसह तिसऱया स्थानी राहिला. याच पीटर्सने मागील महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये 93.07 मीटर्सची अविश्वसनीय फेक करत सुवर्ण जिंकले होते.
2012 ऑलिम्पिक चॅम्पियन केशॉर्न वॉलकॉट 84.02 मीटर्सच्या थ्रोसह चौथ्या स्थानी राहिला. जर्मनीचा ज्युलियन वेबर (84.02 मीटर्स) व झेक प्रजासत्ताकचा टोकियो ऑलिम्पिक रौप्यजेता जकूब (83.91 मीटर्स) अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी राहिले. नीरज चोप्राचा मित्र व प्रतिस्पर्धी, जर्मनीचा अव्वल भालाफेकपटू जोहानेस व्हेट्टरने अगदी अंतिम क्षणी या स्पर्धेतून माघार घेतली. फिनलंडमधील या स्पर्धेतील इव्हेंट्स पाहण्यासाठी 10 हजारहून अधिक चाहते हजर राहिले. चोप्रा आता शनिवारी आयोजित कुर्टेन्स गेममध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर तो दि. 30 जून रोजी डायमंड लीगमध्ये भाग घेईल. अमेरिका व तुर्की येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर नीरज चोप्रा आता फिनलँडमध्ये वास्तव्यास असणार आहे.
बॉक्स
अनुराग ठाकुर, गौतम गंभीरकडून नीरजच्या कामगिरीची प्रशंसा
क्रीडामंत्री अनुराग ठाकुर व माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर यांनी नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवणाऱया नीरज चोप्राची मुक्त कंठाने प्रशंसा केली. ‘गोल्डन ग्रेट नीरज चोप्राने पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी नोंदवली. 89.30 मीटर्सच्या नव्या विक्रमाबद्दल त्याचे खास अभिनंदन’, असे अनुराग ठाकुर यांनी ट्वीट केले. गौतम गंभीरनेही ट्वीटरवरुन नीरजची कामगिरी अव्वल असल्याचे नमूद केले.
कोट्स
हंगामातील पहिल्याच इव्हेंटमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी साकारता आली, याचा मला खास अभिमान आहे. येथील कामगिरीमुळे माझे मनोबल आणखी उंचावले असून पुढील स्पर्धांमध्ये मला याचा विशेष लाभ होईल. टेक्निक, थ्रो, परफॉर्मन्स यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचा मला येथे लाभ झाला. आगामी स्पर्धांमध्येही आणखी सरस कामगिरी करण्यावर माझा भर असेल.
-भारताचा ऑलिम्पिक सुवर्णजेता नेमबाज नीरज चोप्रा
तुर्पू भालाफेक इव्हेंटमधील पदकजेते
ऍथलिट / देश / पदक / थ्रो
1) ऑलिव्हर हेलँडर / फिनलंड / सुवर्ण / 89.83 मी.
2) नीरज चोप्रा / भारत / रौप्य / 89.30 मी.
3) अँडरसन पीटर्स / ग्रेनाडा /कांस्य / 86.60 मी.









