विंडीजची अष्टपैलू डॉटिनची लक्षवेधी खेळी, व्हेलोसिटीविरुद्ध रोमांचक विजय
पुणे / वृत्तसंस्था
विंडीज अष्टपैलू दियान्द्रा डॉटिनने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर लक्षवेधी खेळ साकारल्यानंतर सुपरनोव्हाजने महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. शनिवारी रात्री रंगलेल्या अंतिम लढतीत सुपरनोव्हाजने व्हेलोसिटीविरुद्ध 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला.
डॉटिनने आघाडीवर फलंदाजीला येत 44 चेंडूत 62 धावांचे योगदान दिले. तिच्या या अर्धशतकामुळे सुपरनोव्हाजने 7 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर डॉटिनने गोलंदाजीत 4 षटकांचा कोटा पूर्ण करत 28 धावात 2 बळी घेतले आणि व्हेलोसिटीला 8 बाद 161 धावांवर रोखून धरण्यात सिंहाचा वाटा उचलला.
दक्षिण आफ्रिकन फलंदाज लॉरा वुलवार्टने 40 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी साकारत जवळपास एकहाती विजय मिळवून दिलाच होता. पण, अंतिम क्षणी सुपरनोव्हाजला बाजी मारता आली. लॉराच्या खेळीत 5 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. या स्पर्धेत 2 अर्धशतके झळकावणारी ते एकमेव फलंदाज ठरली. व्हेलोसिटीला शेवटच्या षटकात 17 धावांची आवश्यकता असताना डावखुरी फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनने (2-28) केवळ 12 धावा देत विजय मिळवून दिला. या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार फटकावला गेल्यानंतरही तिने संयमी मारा करत यश खेचून आणले. ऍलाना किंगने 32 धावात सर्वाधिक 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
सुपरनोव्हाज ः 20 षटकात 7 बाद 165 (दियान्द्रा डॉटिन 44 चेंडूत 1 चौकार, 4 षटकारांसह 62, हरमनप्रीत कौर 29 चेंडूत 43, प्रिया पुनिया 28. अवांतर 9. दीप्ती शर्मा 2-20, केट क्रॉस 2-29, सिमरन बहादूर 2-30).
व्हेलोसिटी ः 20 षटकात 8 बाद 161 (लॉरा वुलवार्ट 40 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 65, सिमरन बहादूर 10 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 20, स्नेह राणा 15, शफाली वर्मा 15, यास्तिका भाटिया 13. अवांतर 12. ऍलाना किंग 3-32, सोफी इक्लेस्टोन 2-28, डॉटिन 2-28, पूजा वस्त्रकार 1-32).









