वृत्तसंस्था/ बुखारेस्ट (रोमानिया)
ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हचा पराभव करून ग्रँड चेस टूरवरील त्याची पहिली स्पर्धा जिंकताना सुपरबेट क्लासिकमध्ये आपले वर्चस्व दाखवले.
भारतीय खेळाडूने शेवटच्या फेरीत आर्मेनियन-अमेरिकन ग्रँडमास्टर लेव्हॉन अॅरोनियनिनशी बरोबरी साधून आपने संयुक्तपणे पहिले स्थान निश्चित केले. मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह आणि अलिरेझा फिरोजा यांनीही 5.5 गुणांसह प्रज्ञानंदशी बरोबरी साधली. यामुळे तिघांमध्ये टायब्रेकर झाला. पाच मिनिटे आणि प्रत्येक चालीनंतर दोन सेकंदांचा वाढीव वेळ, असे त्याचे स्वरूप राहिले.
काळ्या सोंगाट्यांसह पहिल्या गेममध्ये प्रज्ञानंदला फिरोजाविऊद्ध थोड्या कठीण स्थितीत कठोर परिश्रम करावे लागले, परंतु अंतिम निकाल बरोबरीत राहिला. दुसऱ्या गेममध्ये फिरोजाने वाचियर-लाग्रेव्हशी बरोबरी साधली. या स्पर्धेच्या शेवटच्या गेममध्ये प्रज्ञानंदने वाचियर-लाग्रेव्हच्या बचावफळीला चिरडून किताब मिळवला. या भारतीय खेळाडूने त्याच्या ब्लिट्झ गेममध्ये 1.5 गुण मिळवले, जे फिरोजापेक्षा अर्ध्या गुणाने जास्त आणि अन्य फ्रेंच ग्रँडमास्टरपेक्षा एका गुणाने जास्त राहिले.









