200 खाटांच्या हॉस्पिटलचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातच्या भुजला मोठी भेट दिली आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भुजमध्ये के. के. पटेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन केले. 200 खाटांचे हे रुग्णालय श्री कच्छी लेवा पटेल समाजाने बांधले आहे. हे कच्छचे पहिले धर्मादाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आज या भागात अनेक आधुनिक वैद्यकीय सेवा अस्तित्वात आहेत. याच भागात आज भुजला आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिळत आहे, असे पंतप्रधानांनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले. तसेच “उत्तम आरोग्य सुविधा केवळ रोगांच्या उपचारापुरत्या मर्यादित नसून त्या सामाजिक न्यायाला चालना देतात. जेव्हा एखाद्या गरीबाला स्वस्त आणि उत्तम उपचार मिळतात, तेव्हा त्याचा व्यवस्थेवरील विश्वास दृढ होतो, असेही त्यांनी सांगितले.
भूकंपामुळे झालेले नुकसान विसरून आता भूज आणि कच्छमधील लोक आता आपल्या मेहनतीने या प्रदेशाचे नवे भाग्य लिहीत आहेत. 200 खाटांचे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कच्छमधील लाखो लोकांना स्वस्त आणि सर्वोत्तम उपचार प्रदान करणार आहे. हे आपल्या सैनिकांना, निमलष्करी दलाच्या कुटुंबियांना आणि व्यापार जगतातील अनेक लोकांना सर्वोत्तम उपचाराची हमी देणार आहेत, असे मोदी म्हणाले. रुग्णालयात इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी (कॅथलॅब), कार्डिओथोरॅसिक सर्जरी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, युरोलॉजी, न्यूरो मेडिसिन, न्यूरो सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट आणि प्रयोगशाळा, रेडिओलॉजी सारख्या इतर सहायक सेवा उपलब्ध असतील, असे पंतप्रधान म्हणाले. या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना परवडणाऱया दरात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
देशाला विक्रमी डॉक्टर मिळतील
देशातील प्रत्येक जिह्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे उद्दिष्ट असो किंवा वैद्यकीय शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न असोत, येत्या 10 वर्षांत देशाला विक्रमी संख्येने नवीन डॉक्टर्स मिळणार आहेत. आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन रुग्णांसाठी सुविधा वाढवेल. आयुष्मान हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनच्या माध्यमातून आधुनिक आणि गंभीर आरोग्य सेवा पायाभूत सुविधांचा विस्तार जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर केला जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आयुष्मान भारत योजना आणि जनऔषधी योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या उपचारासाठी दरवषी लाखो रुपयांची बचत होत आहे. आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशनमुळे रुग्णांच्या सुविधांमध्ये वाढ होणार आहे. या मिशनद्वारे आधुनिक आणि गंभीर आरोग्य सुविधांचा जिल्हा आणि ब्लॉक स्तरापर्यंत विस्तार केला जात आहे.









