सुपर चषकासह ईस्ट बंगाल संघ जल्लोष करताना.
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
कोलकाताच्या बलाढ्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबने सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. रविवारी उशिरा येथे खेळविण्यात आलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगालने ओडीशा एफसीचा 3-2 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
या सामन्यात दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडले. या सामन्यातील निर्णायक गोल ईस्ट बंगालच्या क्लेटॉन स्लिव्हाने केला. सामन्याच्या निर्धारित वेळेत तसेच त्यानंतर देण्यात आलेल्या जादा कालावधीतील पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. सामन्यातील 111 व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा ब्राझीलीयन फुटबॉलपटू क्लेटॉन स्लिव्हाने ओडीशा एससीच्या बचाव फळीला आणि गोलरक्षकाला हुलकावणी देत तिसरा आणि निर्णायक गोल नोंदविला.
या सामन्यामध्ये 62 व्या मिनिटाला सॉल क्रेस्पोने पेनल्टीवर ईस्ट बंगालचे खाने उघडले. ईस्ट बंगालचा दुसरा गोल नंदकुमार शेखरने महेशच्या पासवर केला. 39 व्या मिनिटाला ओडीशा एफसीचे खाते मॉरिसीयोने उघडले होते. ओडीशा एफसीचा दुसरा गोल जेहॉने केला. या स्पर्धेतील विजेत्या ईस्ट बंगाल संघाला आता 2023-24 च्या एएफसी फुटबॉल हंगामात आशिया चॅम्पियन्स लिग 2 प्राथमिक टप्प्यात खेळता येणार आहे. या सामन्यात ईस्ट बंगालच्या शोव्हिकला पंचांनी दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखविले.









