नासाने जाहीर केली परतीची तारीख
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर लवकरच पृथ्वीवर परत येणार असल्याचे स्पष्ट अपडेट्स सोमवारी मिळाले. अमेरिकन एजन्सी नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) आठ महिन्यांहून अधिक काळ घालवलेल्या दोन्ही अंतराळवीरांबाबत माहिती जारी केली. त्यानुसार सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 19 मार्च रोजी परत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी सदर दोन्ही अंतराळवीर एप्रिलच्या सुरुवातीला परत येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता सुधारित अपडेट्सनुसार त्यांचे परतणे पूर्वनियोजित तारखेच्या दोन आठवडे आधी होऊ शकते. जर सुनीता आणि बुच 19 मार्च रोजी परतले तर त्या एकूण 286 दिवस अंतराळात राहिल्याची नोंद होईल.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जून 2024 पासून ‘आयएसएस’वर अडकले आहेत. ते आठ दिवसांच्या मोहिमेवर गेले असताना विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते आठ महिन्यांपासून अंतराळात आहेत. नासा आता 19 मार्च रोजी त्यांना परत आणण्याची योजना आखत आहे. स्पेसएक्सच्या क्रू-10 मोहिमेतील बदलांमुळे हे पुनरागमन शक्य होऊ शकते. विल्यम्स आणि विल्मोर स्पेसएक्सच्या क्रू-10 कॅप्सूलमधून परततील. ही मोहीम 29 सप्टेंबरपासून ‘आयएसएस’शी जोडलेली आहे.









