नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर 19 मार्चच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (आयएसएस) पृथ्वीवर परतणार आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर एलोन मस्क यांच्या अंतराळ संस्था स्पेसएक्सचे रॉकेट फॉल्कन-9 प्रक्षेपित करण्यात यश आल्यानंतर दोन्ही अंतराळवीरांच्या परतीचा मार्ग सुकर झाला आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंगच्या स्टारलाइनरमधून अंतराळात पोहोचले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याचे काम सोपवले आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून फॉल्कन-9 रॉकेट प्रक्षेपित केले. या रॉकेटमधून क्रू ड्रॅगन कॅप्सूलशी जोडलेली चार सदस्यांची टीम ‘आयएसएस’कडे रवाना झाली. या मोहिमेला क्रू-10 असे नाव देण्यात आले आहे. सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बुच विल्मोर नऊ महिन्यांपासून ‘आयएसएस’वर अडकले आहेत. त्यांच्या अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे माघारी येणे लांबले आहे.
क्रू-10 टीम क्रू-9 ची जागा घेईल
नवीन क्रूमध्ये नासाच्या अॅन मॅक्क्लेन आणि निकोल आयरेस, जपानी अंतराळ संस्था ‘जाक्सा’च्या ताकुया ओनिशी आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे अंतराळवीर किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. हे चार अंतराळवीर आयएसएसमध्ये पोहोचल्यानंतर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि क्रू-9 मधील इतर दोन सदस्यांची जागा घेतील.









