सांबरा/ वार्ताहर
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना जोपर्यंत मंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत अनवाणी राहण्याचा व्रत घेतलेल्या हलगा येथील सुनिता बेल्लद यांचा नुकताच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपला नेता हा सर्वोच्च पदावर पोहचला पाहिजे यासाठी अनेक कार्यकर्ते आपापल्या परीने कार्य करत असतात. परंतु असेही काही कार्यकर्ते असतात की जे व्रत घेऊन जोपर्यंत आपल्या नेत्याला इच्छित स्थान मिळत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते आपलले व्रत चालू ठेवतात. असाच एक प्रकार हलगा गावामध्ये एका महिला कार्यकर्त्याने केला आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद मिळावे यासाठी त्या गेल्या एक वर्षापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्या सुनीता बेल्लद या अनवाणी फिरत होत्या. त्यांनी पायात चप्पल न घालता आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले होते. लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपद मिळताच त्यांच्या व्रताचे ध्येय साध्य झाले आहे. व सध्या त्यांनी आपले व्रत सोडले आहे. या व्रताची माहिती मिळताच महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुनीता बेल्लद यांची भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी, युवराज कदम, नागेश देसाई व काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









