दापोली/प्रतिनिधी
आमदार योगेश कदम यांनी दापोलीच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी पक्षाबद्दल केलेले विधान हे बालिशपणाचे असल्याचे टीका रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी दापोली येथे केली.
दापोलीच्या दौऱ्यावर ते आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाचे विचार संपवणे हे डॉ. बाबासाहेब यांनी लिहिलेल्या घटनेमुळे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे आमदार योगेश कदम यांचे वक्तव्य हे बालिशपणाचे वाटते. फारकत घेतलेल्यांना जनमानसात स्थान नसते हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. आघाडी सरकारचे काम उत्तम चालू होते. मात्र काडीमोड घेण्याचा निर्णय आधीच घेतलेल्यांनी आता वेगवेगळी कारण सांगत वेगळी चूल मांडली आहे. मात्र हे राज्यातील जनतेला पटलेले नाही. आघाडी सरकारच्या काळात विकास कामाबाबत घेतलेल्या निर्णयाला सध्याच्या सरकारने स्थगिती दिली आहे ती उठवावी. अन्यथा आपल्याला न्यायालयात जावे लागेल. दापोलीतील कुणबी भवननाबाबत योग्य प्रस्ताव गेलेला असून येथील कुणबी समाजाला लवकरच न्याय मिळेल. स्थानिक निवडणुकाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल. दापोली नगरपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी योग्य निर्णय घेतील असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.