रायगडचा खासदार हा इंडिया आघाडीचाच होणार असल्याचे सांगून सुनील तटकरे यांना आम्ही निवडून दिलं हीच आमची सर्वात मोठी चूक असल्याचा खुलासा शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच भाजपने यात्रा करायला सुरुवात केलेली आहे हाच आमचा सर्वात मोठा विजय आहे. बावनकुळ्यांना आम्ही गांभीर्याने घेत नसून राज्यात सर्व भाजपाविरोधी शक्ती या देशात आणि महाराष्ट्रात एकत्र आल्याने अनेकांना चिंता वाटत आहे. त्यामुळे भाजपने यात्रा सुरु केल्या असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, “रायगडचा खासदार हा इंडिया आघाडीचाच होणार आहे. शरद पवार आणि तटकरे यांची बरोबरी होऊ शकत नाही. तसेच शरद पवार तटकरेंना गांभीर्याने घेत नाहीत. सुनील तटकरे यांना आम्ही निवडून दिलं ही आमची मोठी चूक झाली होती. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आम्ही एकत्र आलो त्याठिकाणी निवडणूका एकतर्फी झाल्या आहेत.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “यापूर्वी भारतीय जनता पार्टी कधीही यात्रा करत नव्हती लोकांमध्ये जात नव्हती पण आता भाजपा यात्रा करायला सुरुवात केलेली आहे हाच आमचा मोठा विजय आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सगळं उलट झालेला आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी धनगरांना आरक्षण देतो असं म्हटलं होतं. मराठा समाजाला सांगितलं होतं की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आरक्षण देऊ, ओबीसींनासुद्धा आम्ही वेगळ्या सवलती देऊ असं सांगितलं होतं. पण आता लोक फसणार नाहीत.” असेही ते म्हणाले.
त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीत गेलो. आम्ही महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहिलो. मात्र त्यावेळी काही लोकांनी आमच्या विरोधात राजकारण केलं. आमचे जे प्रागतिक पक्षांचे मतदार संघ होते. त्या मतदारसंघांमध्ये आम्हाला दगा दिला गेला. सोंगाडे कितीही येतील आणि जातील जनतेने ठरवलंय यांना घरात बसवायचं. निवडणूका घ्यायला हे सरकार घाबरतय.” असा आरोपही त्यांनी सरकारवर केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले,”बावनकुळ्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. आज सर्व बीजेपी विरोधी शक्ती या देशात आणि महाराष्ट्रात एकत्र आल्याने अनेकांना चिंता वाटत आहे. इंडिया आघाडी स्थापन झाल्यामुळे या देशाचे वातावरण बदललेले आहे. आरोग्यमंत्री नेहमी सभागृहामध्ये भाषणामध्ये ते स्वतः अधिकारी भ्रष्ट असल्याचे बोलत असतात. औषधा वाचून तडफडून मृत्यूचे प्रमाण वाढल्याचं या राज्यात असं पूर्वी कधीही घडलं नव्हतं, ही बाब लांचनास्पद आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.