वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशी यांची 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सोमवारी या संघाच्या फँचाईजीनी केली आहे.
भारताच्या वरि÷ निवड समितीमध्ये सुनील जोशी यांचा काही दिवसापूर्वी समावेश होता. 2020 च्या मार्चमध्ये ते भारताच्या वरि÷ निवड समितीचे चेअरमनही होते. त्यानंतर निवड समितीचे अध्यक्षपद चेतन शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आले होते. बीसीसीआयतर्फे चालू महिन्याच्या प्रारंभी घोषित करण्यात आलेल्या नव्या निवड समिती पॅनेलमध्ये त्यांचा समावेश होता. सुनील जोशी यांनी आपल्या 1996 ते 2001 या कालावधीतील क्रिकेट कारकीर्दीत 15 कसोटी आणि 69 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 41 आणि 69 गडी बाद केले आहेत. 2008 आणि 2009 च्या आयपीएल हंगामात सुनील जोशी यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे खेळाडू आणि प्रशिक्षक अशी भूमिका निभावली होती. रणजी स्पर्धेसाठी सुनील जोशी यांनी आतापर्यंत हैदराबाद, जम्मू-काश्मीर आणि आसाम या संघांना मार्गदर्शनही केले आहे. ओमान, बांगलादेश तसेच अमेरिकेच्या क्रिकेट संघांचेही ते फिरकी गोलंदाज प्रशिक्षक होते.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने भारताचे माजी सलामीचे फलंदाज वासीम जाफर यांची फलंदाज प्रशिक्षकपदी तर दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज लँगव्हेट यांची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे प्रशिक्षक वर्गामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॅडिन यांचाही समावेश करण्यात आला होता. 2023 च्या आयपीएल हंगामासाठी शिखर धवनकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.









